Pune: प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पंडित यांचे निधन

पुणे – केईएम हॉस्पिटल, पुणे येथील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद नीलकंठ पंडित यांचे दि. २० सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी डाॅ. पौर्णिमा, दोन मुली आरती पंडित-देवल आणि प्रिती, मुलगा डाॅ. चेतन असा परिवार आहे.
डॉ. आनंद पंडित यांनी पाच दशकांहून अधिक काळ बालरोग चिकित्सा आणि संशोधनाद्वारे मोठे योगदान दिले आहे. लहान मुलांमधील आजाराचे अचूक निदान आणि मुदतपूर्व जन्मलेले आणि इतर उच्च जोखीम असलेले नवजात शिशूंची चिकित्सा आणि परिणामांमध्ये सुधार यामध्ये त्यांचे कार्य मोठे आहे. डॉ. बानू कोयाजी यांच्याबरोबर तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी काम केले.
सन १९६७ मध्ये बालरोग चिकित्सा विभाग स्थापन झाला आणि केईएम हॉस्पिटलला एक नवी ओळख मिळाली. त्यानंतर १९७७ साली “एनआयसीयू’ स्थापन करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विकासात्मक आणि वर्तनात्मक समस्या असलेल्या लहान मुलांसाठी निदान व चिकित्सा करणाऱ्या केईएम हॉस्पिटलमधील टीडीएच रिहॅबिलिटेशन अँड मॉरिस चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरची १९७९ मध्ये स्थापना करण्यात डॉ. पंडित यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी जवळपास साडेतीनशेहून अधिक बालरोग विभागातील डाॅक्टर घडविले.
कौटुंबिक माहिती….
डाॅ. आनंद पंडित यांचा जन्म २३ मार्च १९४२ बडोदा येथे झाला. त्यांचे वडिल बडोदा येथे वरिष्ठ आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आनंद यांचे प्राथमिक शिक्षण बडोदा येथील रोझरी शाळेत झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर पंडित कुटुंबीय पुण्यात स्थायिक झाले.
त्यामुळे गरवारे शाळेत शालेय शिक्षण घेऊन, महाविद्यलयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर बी. जे. वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातून रॅकिंगमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथून एम.डी. (पेडियाट्रिक) पूर्ण करून पुण्यातून केईएम रुग्णालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी सलग साठ वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा केली.
“डाॅ. आनंद पंडित हे सर्व क्षेत्रांत मास्टर होते. त्यांना टेनिस, क्रिकेट या खेळांची आवड होती. त्याचबरोबर वाचन आणि संशोधनात त्याचा हातखंडा होता. स्वभावाने प्रेमळ आणि नेहमी मदतीसाठी पुढे असायचे. त्यांच्या कार्यामुळे सगळे त्यांना देवासारखे मानत होते.’ – आशा उगळे, डाॅ. आनंद पंडित यांच्या बहीण
“वैद्यकीय क्षेत्रातील आदरणीय नाव म्हणजे डाॅ. आनंद पंडित. ते इतके मोठे डाॅक्टर असल्याचा आम्हाला अभिमान होता. त्यांचे काम ऋषितुल्य होते. हिपॅटायटिस-बी रीसर्चमध्ये त्याचे मोठे योगदान आहे. ते सतत अभ्यास करायचे. ते नेहमी अपडेटेड असायचे.” – सुप्रिया पिळगांवकर, सिनेअभिनेत्री तथा डाॅ. आनंद पंडित यांच्या भाची.





