Pune: महंमदवाडीचे नाव महादेववाडी करा; भाजपचे योगेश टिळेकर यांची विधान परिषदेत मागणी

हडपसर – हडपसर उपनगरात असलेल्या महंमदवाडीचे नाव बदलून ते महादेववाडी करावे, यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महंमदवाडी येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेली ३० वर्षे हे ग्रामस्थ या नामांतरासाठी लढा देत आहेत.
या परिसरात एकही मुसलमान कुटुंब नसताना महंमदवाडी नाव का ठेवायचे? वर्ष १९९५ मध्ये या गावाचे महादेववाडी ठेवावे, असा निर्णय ग्रामसभेच्या माध्यमांतून ग्रामस्थांनी घेतला गेला आहे. त्यामुळे शासनाने त्यांचा आदर करून नामांतर करावे, अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत केली.
टिळेकर म्हणाले, की वर्ष १९९७ मध्ये या गावाचे सर्व ग्रामस्थ पुणे महापालिकेत गेले. वर्ष २०१४ मध्ये स्थानिक नगरसेवकांनी समितीमध्ये हा विषय आयुक्तांना सांगितला; परंतु आयुक्तांनी ही गोष्ट शासनाकडे असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे गेला. गेली वर्षे अनेक ग्रामस्थ आणि नगरसेवक याचा पाठपुरावा करत आहेत. मात्र, कागदपत्रे सापडत नसल्याचे कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येते. त्यामुळे या ग्रामस्थांची भावना तीव्र झाली आहे.
सन 2015 मध्ये महापालिकेच्या नाव समितीला महंमदवाडी गावचे नाव बदलून ते महादेववाडी करावे, याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्याच वेळी ग्रामसभेत ठराव, तसेच आवश्यक कागदपत्रे आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षरींचे निवेदनही दिले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातही ही कागदपत्रे जमा केली होती. आमदारांनी विधान परिषदेत ही बाब लक्षात आणून दिल्याने लवकरच अधिकृत घोषणा होण्याची आशा आहे. – विजया वाडकर, माजी नगरसेविका





