pune : फळ, भाजीपाला विभागातील अतिक्रमणे हटवा

बाजार समितीचे विभाग प्रमुखांना आदेश
पुणे – संचालक मंडळाच्या कार्यकाळात सुरू केलेले अनियमित स्टॉल, टपऱ्या, दुकानांचे वाटप, मोकळ्या जागांचा दुरूपयोग आदींबाबत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश फळ, भाजीपाला विभाग प्रमुखांना दिले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी बाजार आवारातील अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला आहे.
हा आदेश दिला असला, तरीही अतिक्रमणावर कारवाई होणार का?, हा आदेश केवळ दिखावा आहे का, असा प्रश्न बाजार घटकातून उपस्थित केला जात आहे. याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळेल.
बाजार समिती आवारातील अतिक्रमणाबाबत मागील अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी सभापती आणि सचिवांचे कान् टोचल्याचेही कळाले होते. त्यानंतर आता बाजार समितीची चौकशी लागली आहे.
लवकरच अहवाल सादर करण्याचे आदेश पणन सहसंचालकांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाकडून अतिक्रमणे काढण्याचा आदेश दिल्याची चर्चा आहे.





