पुणे : म्युकरमायकोसिसचे रुग्ण घटल्याने दिलासा

पुणे –करोनापाठोपाठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढले होते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून म्युकरच्या रूग्णांमध्ये लक्षणीय घट झाली असून, एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
करोनातून बरे झालेल्या पण, प्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत आहे. विशेषत: ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्यांना हा संसर्ग होत आहे. हा आजार संसर्गजन्य नसला, तरी लागण झाल्यानंतर उपचार वेळेत घेतले नाही तर जीवघेणा ठरू शकतो.
ग्रामीणमध्ये एप्रिल महिन्यात म्युकरचे 11 रुग्ण सापडले, तर 6 जणांचा मृत्यु झाला. जूनमध्ये सर्वाधिक 44 रुग्ण सापडले तर 3 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ग्रामीण भागात एकूण 79 म्युकरचे रुग्ण सापडले असून, त्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 66 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 4 जणांवर उपचार सुरू आहे.जुलैच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता होती, मात्र ग्रामीणमध्ये एकही नवीन रुग्ण सापडला नाही. तसेच एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.





