Pune : रुग्णवाहिका देण्यास नकार; मृतदेह नेला टेम्पोतून

खडकी – एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असल्याने स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हाॅस्पिटलची शववाहिका बंद पडली असल्याने नातेवाईकांना शववाहिका उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
अवघ्या काही वर्षांपर्यंत देशातील सर्वाधिक श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता या बोर्डाचा कारभार ढासळला असल्याने तसेच त्याकडे लक्ष देण्यास कोणासही वेळ नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
बुधवारी (दि. २ जुलै ) रोजी रात्री खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात एक व्यक्ती दगावली. त्यानंतर, मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाकडे शववाहिनीची मागणी केली. मात्र, ही शववाहिनी नादुरुस्त असल्याने सुरुवातीला नातेवाइकांना काहीच सांगण्यात येत नव्हते. तर रुग्णालयाचे डाॅक्टर आणि बोर्डाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत राहिले.
या वादात मृतदेह तब्बल तीन तास रुग्णालयातच राहिला. त्यानंतर नातेवाइकांनी व सामाजिक कार्यकत्यांनी दबाव आणल्यानंतर त्या दगावलेल्या व्यक्तीला रुग्णालयाच्या इमर्जन्सी ॲम्ब्युल्न्समध्ये मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली. तर आणखी एका घटनेत २६ जून रोजीही अशाच एका व्यक्तीला शववाहिका नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मृतदेह टेम्पोमध्ये घेऊन जाण्याची वेळ ओढावली होती.
रुग्णालयाकडे सध्या एक शववाहिका आणि एक एमर्जन्सी रुग्णवाहिका आहे. तर शववाहिका अनेक दिवसांपासून बंद असल्याने सामाजिक कार्यकर्ते इद्रीस सय्यद यांनी सांगितले. तसेच, तातडीने शववाहिनी उपलब्ध करून देण्याचे निवेदनही बोर्डाचे सीईओ यांच्याकडे सय्यद यांनी दिले आहे.
रुग्ण मयत झाल्यावर हाॅस्पिटलकडे शववाहिका मागितली. मात्र, ती बंद असल्याचे प्रशासनाने सांगितले. खडकीकर नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी बोर्डाची आहे. हाॅस्पिटलकडून सुविधा न दिल्यास खडकी छावणी परिषदेत तीव्र आंदोलन करावे लागेल. – रिकेश पिल्ले आरपीआय युवा (अ) अध्यक्ष खडकी विभाग
रुग्नालयात एकच रुग्णवाहिका आणि शववाहिनी आहे. खडकीकरांसाठी ती मोफत आहे. शववाहिनी आठवडाभरापासून नादुरुस्त असल्याने गॅरेजमध्ये आहे. रुग्ण दगावला असून, त्याला नेण्यासाठी अॅम्ब्युलन्सचे गरज आहे, असे समजताच तत्काळ इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स देण्यात आली. शववाहिनी दुरुस्त झालेली असून, तिचे बिल अदा केल्यानंतर ती आणली जाईल. – एस. आर. पत्की, आरोग्य निरीक्षक





