pune : पॉलिटेक्निक प्रवेशात यंदा विक्रम होणार!
Pune:

तीन फेऱ्यांनंतर १ लाखाच्या उंबरठ्यावर प्रवेश
pune : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात केलेले आधुनिक बदल आणि उद्योगस्नेही शिक्षण पद्धतीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा पदविका (पॉलिटेक्निक) शिक्षणक्रमाकडे कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्यांअखेर तब्बल ९९ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून, यंदा गेल्या वर्षीचा १ लाख ७ हजारांचा विक्रम सहज मोडला जाईल, असा विश्वास तंत्रशिक्षण संचालनालयाने व्यक्त केला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, डेटा ॲनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारख्या अत्याधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, मायक्रो आणि कॅपस्टोन प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट उद्योगांशी जोडण्यात आले आहे.
मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांतून परीक्षेची सुविधा, ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आणि ‘डिप्लोमा साथी’ एआय-व्हॉट्सॲप सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद वाढला आहे.
राज्यातील ४४८ संस्थांमधील १ लाख ३८ हजार ९०७ जागांपैकी तिसऱ्या फेरीत सर्वाधिक विद्यार्थ्यांना पसंतीचे प्रवेश मिळाले आहेत. यंदा प्रवेशाचा नवा नीचांक मोडून ऐतिहासिक टप्पा गाठला जाण्याची चिन्हे आहेत.





