Fake mark sheet: बनावट गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र तयार करणारा जेरबंद
Fake mark sheet:

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
Fake mark sheet: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने बी.कॉम. शाखेची बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून ७० हजार रुपयांना विकल्याप्रकरणी आणखी एकाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. या आरोपीनेच संबंधित बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तयार केले असून, आणखी काही विद्यार्थ्यांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रदीप महादेव खताते (वय ५३, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला विद्यापीठातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर (वय ४८, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) यांच्याविरोधात चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, विद्यापीठ प्रशासनाने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुखेकर हा वित्त व लेखा विभागातील कर्मचारी असून, परीक्षा विभागात कार्यरत आहे. त्याने विद्यापीठातील एका विद्यार्थ्याच्या वडिलांना त्यांचा मुलगा बी.कॉम. पदवीधर झाल्याचे भासवून बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र दिले. आरोपी खताते याने संबंधित बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्र तयार करून दिले.
त्याबदल्यात आरोपींनी ७० हजार रुपये गुगल-पेच्या माध्यमातून स्वीकारल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. आरोपी खताते याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला, त्याने इतरही काही विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे बनावट पदव्या देऊन फसवले आहे का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शीला घोडेस्वार यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.





