Pune : श्री महालक्ष्मी मंदिरासमोर श्रीसूक्त पठण

पुणे –
हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥
या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर मंगळवारी मंत्रमुग्ध झाला. शेकडो महिला आणि पुरुषांनी सामूहिकरीत्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठणातून देवी शक्तीची आराधना करण्यात आली. या वेळी वरुणराजाही बरसला; परंतु देवीच्या गजराने आणि शंखनादाने मंगळवारची पहाट मंगलमय झाली.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला सामूहिक श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी मंदिराच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद पथकातील वादकांच्या शंखवादनाने झाली. कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय माता दी… च्या जयघोष करत आसमंत दणाणून सोडला. श्रीसूक्त म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि महती याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्रीसूक्ताचे तीन पाठ असे सामूदायिकरीत्या पठण करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. मंदिराच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नृत्यांगना नृत्य अकॅडमीच्या राधिका आवटे आणि सहकाऱ्यांनी दशावतार सादरीकरण केले.
‘धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. सामूहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. यंदा श्रीसूक्त पठणाच्या कार्यक्रमासह नारीशक्तीचा सन्मान, सामूहिक गरबा आणि प्रतीकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे.’ – डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त, श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग





