पुणे : एक डिसेंबरपासून राजीव गांधी प्राणिसंग्रहालय सुरू होणार!

पुणे –कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचा प्रस्ताव संग्रहालयाने अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे दिला आहे. मात्र, संग्रहालयाबाबत राज्य सरकारच्या निर्देशांचा विचार करून सुरू करण्याला परवानगी द्यायची का, याचा विचार करण्यात येणार असल्याचे मोळक यांनी सांगितले.
गेल्या 19-20 महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केल्याने साहजिकच प्राणिसंग्रहालयेही बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर बऱ्याच व्यवहारांमध्ये केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली. उद्याने, जीम, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, प्राणिसंग्रहालय सुरू करण्याबाबत अद्याप कोणतेच निर्देश राज्य सरकारने दिले नाहीत.
एक डिसेंबरपासून राजीव गांधी प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाला दिला आहे.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय सुरू करण्याच प्रस्ताव देण्यात आला आहे. राज्य सरकारचे याबाबतीतले निर्देश काय आहेत हे पाहून, आयुक्तांच्या परवानगीने पुढील आदेश दिले जातील.
– ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका





