Pune : घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार

पुणे – पावसाने उघडीप दिली असून, रविवारी (दि. २०) दिवसभर ऊन, ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. उपनगरात काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. २३ आणि २४ जुलै रोजी घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुणे वेधशाळेने घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
गेल्या २४ तासात ताम्हिणी घाट परिसरात ९२, मुळशी येथे २१ आणि अंबवनेला ३२ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे कमाल तापमान ३४ अंशापर्यंत पोहचले होते. परिणामी उकाडा अधिक वाढला. आज सकाळपासून ढगाळ वातावरणाबरोबर पावसाच्या अति हलक्या सरी पडल्या.
कोरेगांव पार्क येथे ४ मिमी पावसची नोंद झाली. मगरपट्टा, हवेली आणि शिवाजीनगर परिसरात अर्धा मिमी पाऊस झाला. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. अति हलक्या पावसाची सरी पडण्याचा अंदाज आहे.





