Pune Rain Updates: पुणे शहर आणि जिल्ह्याला पुढील ४८ तास ‘यलो अलर्ट’; हवामान विभागाचा अंदाज
Pune Rain Updates: बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय; शनिवारी पहाटेपासूनच पुण्याच्या कमाल तापमानात ३ ते ४ अंशांची घट.

Pune Rain Updates – शहरासह उपनगरात शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून, अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कमाल तापमानात तीन ते चार अंशाने घट झाली. हवेत गारवा निर्माण झाल्याने मागील आठ दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. शनिवारी पहाटेपासूनच शहरावर काळे ढग दाटून आले होते. त्यामुळे सकाळीच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर आणि जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली.
त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पेठांसह कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, कोथरुड, हडपसर, स्वारगेट, सिंहगड रोड आणि कल्याणीनगर या उपनगरांमध्ये पावसाच्या एक ते दोन जोरदार सरी पडल्या. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि सुट्टीला फिरण्यासाठी आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, हडपसर, भुगाव, वारजे, हिंजवडी या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी झालेल्या वाहतूक कोंडींमुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान बदलामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने पुढील ४८ तास जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शनिवारचा पाऊस
बालेवाडी ११, कोरेगाव पार्क ९, गिरीवन ८, वारजे ६, खडकवासला ५, डेक्कन-पाषाण ४, चिंचवड, शिवाजीनगर ३, आंबेगाव, कात्रज-शिरूर २, हवेली, बारामती-एनडीए १, कुरवंडे ३२, निमगिरी ३०, भोर १२ मिमी.





