Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग
Pimpri-Chinchwad : गणना प्रपत्र वेळेत भरण्याचे नागरिकांना आवाहन

पिंपरी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एस आय आर ) अभियान सुरू असून गणना प्रपत्र (ई.एफ) वाटपाचे काम वेगाने सुरू आहे.
राज्यातील सर्वाधिक ६ लाख ८७ हजार ४४८ मतदार असलेल्या या मतदारसंघात मंगळवार (१४ जुलै) दुपारी ४ वाजेपर्यंत ३२.५७ टक्के गणना प्रपत्रांचे वाटप पूर्ण झाले असून, प्राप्त प्रपत्रांपैकी १०.२४ टक्के प्रपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार हे काम ३० जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत कायमस्वरूपी स्थलांतरित, मयत तसेच दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे पडताळणीनंतर वगळण्यात येणार असून त्यासाठी पंचनामे व आवश्यक ते जबाब नोंदवले जाणार आहेत.
प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. गणना प्रपत्र (EF) भरून न दिल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रारूप यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत त्यावर सुनावणी होईल. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अमोल कदम यांच्यासह ५० सहायक मतदार नोंदणी अधिकारी, ९ समन्वयक, ५६ नोडल अधिकारी, ५६१ बीएलओ आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना ECINET ॲपद्वारे किंवा संबंधित बीएलओशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करण्याचे तसेच मतदार यादीतील नावाची खात्री करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.





