Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा जोर वाढला! ४ दिवसांत ७३ मि.मी. पाऊस; पाहा तुमच्या भागात किती झाली नोंद?
Pune Rain Updates: घाटमाथ्यावर पावसाचे रौद्ररूप! भिरा येथे २४० तर ताम्हिणी घाटात २०० मि.मी. पाऊस पडल्याने धरणसाठ्यात हळूहळू वाढ.

Pune Rain Updates – शहरासह उपनगरांत गेली तीन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली आहे. शनिवारी (दि. ४) पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. शहरात जून ते आजपर्यंत एकूण १३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या चार दिवसांत ७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर वाढला असून धरणसाठ्यांत हळूहळू वाढ होत आहे.
पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. जिल्ह्यासह शहरात शनिवारी (दि. ४) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार आजची पहाट जोरदार सरींनीच झाली. शिवाजीनगर, कोथरूड, पाषाण, औंध, खडकवासला, कात्रज, धायरी, हडपसर, विश्रांतवाडी यासह अन्य परिसरात जोरदार सरी कोसळल्या, आज सायंकाळपर्यंत शिवाजीनगर परिसरात १६ तर चिंचवड येथे ३९ मिमी पावसाची नोंद झाली.
दिवसभर पावसाचा जोर कमी-अधिक होत असला तरी संततधार पावसामुळे स्वारगेट, सातारा रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, लाॅ-काॅलेज रस्ता, कोथरूड, डेक्कन, नगर रोड आणि हिंजवडी या उपनगरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. दरम्यान, दुपारनंतर शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने बाजारपेठांमध्ये काहीशी गर्दी वाढल्याचे दिसून आले. मात्र, संध्याकाळी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडवली. शिवाजीनगर, चिंचवडसह लोहगाव येथे १९, एनडीए परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
ताम्हिणीत २०० मि.मी.ची नोंद
ताम्हिणी घाटमाथ्यासह अन्य डोंगरमाथ्यावा मुसळधार पाऊस पडत आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही छोट्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत घाटविभागातील ताम्हिणी परिसरात २०० मि.मी. पावसाची नोंद झाली. भिरा येथे २४० तर शिरगाव घाटमाथ्यावर १६५, दावडी येथे १६९ तर डुंगरवाडी येथे १६२ मिमी पावसाची नोंद झाली.




