Talegaon Dhamdhere: तळेगाव ढमढेरे परिसरात वरुणराजाची दमदार एन्ट्री! कोमेजणाऱ्या पिकांना जीवदान, शेतकरी सुखावला
Talegaon Dhamdhere: अनेक दिवसांच्या दडीनंतर सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल; मका, बाजरी, सोयाबीन आणि ऊस पिकांना तात्पुरते नवसंजीवनी.

Talegaon Dhamdhere – अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तळेगाव ढमढेरे व परिसरातील नागरिकांना सोमवारी अखेर दिलासा मिळाला. दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार सरींमुळे तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. व्यापारी, ग्राहक आणि शेतकर्यांची माल वाचविण्यासाठी एकच धावपळ उडाली; मात्र दुसरीकडे पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना या पावसामुळे तात्पुरते जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यंदाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा ताण निर्माण झाला होता. मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला तसेच ऊस आणि जनावरांच्या चार्याची पिके उन्हाच्या तीव्रतेमुळे कोमेजू लागली होती. अनेक शेतकर्यांनी पेरणीपूर्व तयारी पूर्ण केली होती; मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणी लांबणीवर पडली होती. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन काळे ढग दाटले आणि जोरदार वार्यासह पावसाला सुरुवात झाली.
त्यावेळी तळेगाव ढमढेरेचा आठवडे बाजार भरलेला असल्याने व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. भाजीपाला, फळे, किराणा साहित्य, कपडे व इतर वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या व्यापार्यांनी माल सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री आणि प्लास्टिकचा आधार घेतला. ग्राहकांनीही दुकानांच्या आडोशाला आश्रय घेतला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारातील व्यवहार काही काळ विस्कळीत झाले. दरम्यान, या पावसामुळे परिसरातील तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला. शेतशिवारात ठिकठिकाणी पाणी साचल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांच्या वाढीस मदत होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, केवळ एका पावसाने परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नसून खरीप हंगाम वाचविण्यासाठी सातत्याने समाधानकारक पाऊस होणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुढील काही दिवस चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






