Pune: स्थायी समितीत प्रस्तावांचा पाऊस; आचारसंहितेच्या भीतीने १६० प्रस्तावांना मान्यता

पुणे – दसऱ्यानंतर राज्यात कोणत्याही दिवशी विधानसभा निवडणुकांची आचरसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल १६० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या कामांची रक्कम १०० ते ११० कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर मान्यता मिळताच तत्काळ मुख्यसभेतही हे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकांमुळे महापालिका आयुक्तांनी मागील महिन्यातच प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यात वित्तीय समितीत मान्यता देण्यात आलेल्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ त्यांना स्थायी समितीची मान्यता घेत आचारसंहितेत कामे अडकणार नाहीत, याची दक्षता घेण्य़ाचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, त्यानंतरही अनेक विभाग प्रमुख्यांकडून आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे ही समितीची बैठक या आठवड्यात प्रस्ताव न आल्याने वारंवार पुढे ढकलण्यात येत होती. गुरुवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती. संध्याकाळी उशिरा ही बैठक सुरू झाल्यानंतर आयत्यावेळी मंजुरीसाठी अनेक प्रस्ताव विभागप्रमुखांकडून ठेवण्यात आले.
ऐनवेळी इतके प्रस्ताव झाल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. प्रस्तावांची संख्या मोठी असल्याने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बैठक तहकूब करत शुक्रवारी स्थायी समितीची बैठक घेत सर्व प्रस्तावांना मान्यता दिली.
कार्यादेश देण्यासाठी लगबग
मान्यता मिळालेल्या प्रस्तावांचे कार्यादेश तत्काळ देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. ही कामे वेळेत सुरू न झाल्यास ती करता येणार नाहीत. तसेच अनेक कामे आमदार निधीतील असल्याने त्यांच्याकडून या कामांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. प्रशासनाने पुढील तीन ते चार दिवसांत कार्यादेश देण्याची तयारीही सुरू केल्याने महापालिकेत ठेकेदारांची लगबग सुरू असल्याचे बोलले जात आहे.





