Pune : विसर्जनानंतर पावसाची उघडीप; शहरासह उपनगरात हवामान कोरडे आणि ऊन

पुणे – विसर्जन मिरवणुकीनंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे मागील ४८ तासांत शहरासह उपनगरात हवामान कोरडे आणि ऊन जाणवत आहे. हवेतील गारवाही कमी झाला असून, कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर पुढील दोन दिवस शहरात चांगल्या पावसाची शक्यता कमी असून, अति हलका पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी (दि. ७ सप्टेंबर) सकाळीच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली असे वाटत होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप दिली. तर आज दिवसभर (दि. ९) आकाश निरभ्र, ऊन आणि हवामान कोरडे होते. त्यामुळे शहर आणि उपनगरात कुठेच पावसाची नोंद झालेली नाही.
तर पुढील दोन दिवस शहरात पावसाची शक्यता नसून, जिल्ह्यात अति हलका आणि घाट विभागात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
गेल्या २४ तासात पुणे जिल्ह्यातील घाट विभागातील ताम्हिणी घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. याठिकाणी २० मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळा परिसरात ६, वळवण येथे १६, दावडी आणि अंबवने घाट परिसरात १० आणि डुंगरवाडी परिसरात १३ मिमी पावसाची नोंद झाली. तर पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील.





