प्रभात वृत्तसेवा पुणे – लोणावळा-बीव्हीटी यार्ड आणि कल्याण-लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह अन्य राज्यातून या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. काही गाड्या उशीराने धावणार असून, काही गाड्या लोणावळाच्या अलीकडेपर्यंत धावणार आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेसलाही २८, २९ नोव्हेंबरला मुंबईत पोहचण्यास १० ते १५ मिनिटे उशीर होणार आहे.२६, २७ नोव्हेंबरला डाउन मार्गावर सव्वाअकरा ते संध्यकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत ब्लाॅक असेल. त्यामुळे जोधपूर-हडपसर एक्सप्रेस कर्जत येथे ४५ मिनिटे थांबले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई एक्सप्रेस लोणावळा येथे १ तास थांबले. लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई एक्सप्रेस भिवपुरी रोडयेथे १० मिनिटे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस आणि हैदराबाद एक्सप्रेसला लोणावळामध्ये येण्यास १० ते १५ मिनिटांचा उशीर होईल. लोकमान्य टिळक टर्मिनस – काकिनाडा एक्सप्रेस २७ नोव्हेंबरला भिवपुरी रोड येथे १० मिनिटे थांबेल. तसेच पुणे – लोणावळा उपनगरी गाड्या तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील २८, २९ नोव्हेंबरला अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.२५ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस एक तास १५ मिनिटे, दौंड – इंदौर एक्सप्रेस एक तास, कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्सप्रेस ४० मिनिटे, बेंगळूरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्सप्रेस ३० मिनिटे, नागरकोइल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दीड तास, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्सप्रेस १० मिनिटे नियमन करण्यात येईल. पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस आणि पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. पुणे-लोणावळा उपनगरीय गाड्या तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.