Missing Child Story : ‘वंदे भारत’ सुटली अन् ३ वर्षांची लेक एकटीच राहिली! कुर्डुवाडी ते पुणे प्रवासात नक्की काय घडलं?
Missing Child Story : सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे.

Missing Child Story – पुणे रेल्वे संरक्षण दलाने दाखवलेली तत्परता आणि ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत राबवलेल्या मोहिमेमुळे रेल्वेमध्ये हरविलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीला सुरक्षितपणे पालकांकडे सोपविण्यात यश आले. सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस गाडीने
कुर्डुवाडी स्थानकावरून वेग पकडल्यानंतर कोच सी-५ मधील सीट क्रमांक ३० वर एक तीन वर्षांची मुलगी रडताना दिसली. त्यावेळी ड्युटीवर असलेले टीटीई एच. एल. मीना यांनी मुलीकडे चौकशी केली असता, ती एकटीच असल्याचे समजले. मुलीचे वडील हे कुर्डुवाडी स्थानकावर बिस्किट आणण्यासाठी उतरले होते. मात्र, ते वेळेत न आल्यामुळे गाडीचे दरवाजे लाॅक झाले आणि गाडी सुटली. त्यामुळे वडील आणि मुलीची ताटातूट झाली.
यावेळी टीटीई मीना यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल विनय प्रकाश आणि एएसआय एन. एन. नलावडे यांनी परिस्थिती हाताळत मुलीला असुरक्षित वाटू नये, ती घाबरू नये यासाठी एका सहप्रवासी महिलेच्या मदतीने तिला शांत करून तिची काळजी घेतली. यावेळी सर्व माहिती घेतल्यानंतर मुलीच्या वडीलांशी संपर्क साधून त्यांना मुलगी सुरक्षित आहे. तुम्ही घाबरून न जाता पुढील गाडीने पुणे स्थानकावर येण्याचे सांगितले.
गाडी पुणे स्थानकावर पोहोचताच आरपीएफ पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तीन वर्षाच्या चिमुरडीला सुखरूपणे तिच्या आईकडे सोपविण्यात आले. आपल्या काळजाचा तुकडा सुखरूप मिळाल्याचे पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. या यशस्वी कामगिरीमुळे पुणे विभागातील आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवासी सुरक्षा ही केवळ घोषणा नसून ती आमची बांधिलकी आहे, हे रेल्वेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.





