Pune : रेल्वे विभागाचा १७ तास ब्लॉक; हडपसर स्थानकावरील ४ सब रेल्वे लाइन जोडल्या

पुणे – हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी नॉन-इंटरलॉकिंग आणि प्री-नॉन-इंटरलॉकिंगची कामे रविवारी (दि. २०) करण्यात आली. त्यासाठी पुणे रेल्वे विभागाकडून शनिवारी रात्री १२ ते रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १७ तास ब्लाॅक घेण्यात आला.
या वेळी काही गाड्या वळविण्यात आल्या, तर आझाद हिंद एक्स्प्रेससह अन्य गाड्या पुणे स्टेशनवर न आणता लोणी स्थानकावर थांबवल्या. तेथून सर्व प्रवाशांना पुण्यात आणण्यासाठी पीएमपीच्या १५ बसची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली होती.
पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास करण्यात येत आहे. हडपसर स्थानकावरील मुख्य रेल्वेलाइन इतर चार सब रेल्वे लाइनला जोडण्याचे काम रविवारी (दि. २०) हाती घेण्यात आले. त्यासाठी रेल्वे कर्मचारी १७ तास रात्रंदिवस कामावर होते. यामुळे दाैंड-पुणे, दौंड-बेलवंडी, पुणे-हरंगुळ एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस या प्रमुख गाड्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे पूर्वनियोजित प्रवास करणाऱ्यांची गैरसोय झाली, तसेच मेल, एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत होत्या.
‘हडपसर स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. त्यामुळे रविवारी ब्लाॅक घेण्यात आला होता. या वेळेत नियोजित कामे करण्यात आली.’- हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे





