Pune: ७ थर लावून कसब्यातील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी

पुणे : बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या दहीहंडी उत्सवात कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी सात थरांचा मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला. शनिवारी रात्री ९:३० वाजता चौथ्या प्रयत्नात विराज कांबळे या गोविंदाने यशस्वीपणे हंडी फोडली. बेलबाग चौकाजवळील जय गणेश प्रांगणात या पारंपरिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, प्रतिक घोडके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या या सोहळ्याला गोपाळभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा ४० फूट उंचीच्या भव्य एलईडी स्क्रिनवर श्रीकृष्ण लीलेचे दर्शन घडवण्यात आले, ज्याने उपस्थितांचे मन जिंकले.
राधेकृष्ण ग्रुपच्या गोविंदांनी हंडी फोडताच भक्तांनी ‘मच गया शोर… बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणांनी जल्लोष केला. विजेत्या पथकाला ५१ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्सवाला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टच्या वादकांनी पारंपरिक वाद्यवादनाने रंगत आणली. पारंपरिक आणि नव्या गाण्यांच्या तालावर तरुणांनी उत्साहात नृत्य करत गोपाळकाला साजरा केला. पुण्यासह इतर शहरांमधून अनेक गोविंदा पथके या दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी झाली होती, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली.





