Pune: मनपाच्या दुर्लक्षामुळेच पुण्याची दुरवस्था – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे– शहरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला असताना, पुणेकरांना आपत्कालिन सेवा देण्यात महापालिका अयशस्वी ठरली आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे ही दुरवस्था पुणे शहरावर ओढवली आहे, असा आरोप खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच नागरिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच पावसाळ्यासाठीची आवश्यक कामे करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
शनिवारी पावसामुळे अनेक ठिकाणी घराघरांमध्ये पाणी जाऊन टीव्ही, फ्रिज आणि इतर वस्तू नादुरुस्त झाल्या आहेत. अर्धा-एक तासाच्या पावसामुळे पाणी वीजमीटर रूमपर्यंत गेले. महापालिकेने आणि यंत्रणांनी याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता होती. अनेक विविध गैर गोष्टींकडे झालेले दुर्लक्ष, गैरप्रकारांकडे डोळे झाक किंवा आशीर्वाद त्यातून ही स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप खासदार कुलकर्णी यांनी केला आहे.
खासदार कुलकर्णी यांनी केलेल्या मागण्या
– अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी.
– पावसाळी पाण्याची गटारे किती तरी ठिकाणी अस्तित्वात नाहीत, आहेत ती साफ नाहीत. काही ठिकाणी ड्रेनेज लाइन त्यात एकत्र झाल्या आहेत. त्या पुरेशा क्षमतेने दुरुस्त व्हाव्यात
– नदीपात्राची खोली वाढवायला पाहिजे. कित्येक ठिकाणी नाले बुजवले आहेत. या सर्व गैरव्यवस्थांमुळे नागरिकांचे नुकसान झाले.
– नैसर्गिक नाल्यांवर असलेली बांधकामे आणि गैरप्रकारांवर धडक कारवाई व्हायला हवी
– नाल्यांची रुंदी टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना आवश्यक
– मुख्य रस्ते, महापालिकेच्या आणि अन्य खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करावे.





