पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेपर्वा वृत्तीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या आरोपाने सध्या शहरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर या रुग्णालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काढला आहे. रुग्णालयाच्या १०० मीटर परिसरात बेकायदा जमाव जमवून आंदोलन व तत्सम गोष्टी करण्याला बंदी घालण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतरांना एकत्र जमण्यास व रुग्णालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरात दोन किंवा जास्त व्यक्तींनी एकत्रित येऊ नये. परिसरात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास, तसेच आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यास अथवा चिटकविण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ८) रात्री हा आदेश देण्यात आला आहे. १९ एप्रिलपर्यंत हा आदेश अंमलात राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारा भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.