पुणे – देशातील अनेक महत्त्वाच्या कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंदला पुण्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला. मुख्यत्वे केंद्राच्या नव्या श्रमिक कायद्यांविरोधात जाहीर करण्यात आलेल्या बंदमध्ये देशभरातून २५ कोटी कामगारांनी सहभाग घेतला. या वेळी कामगारांनी त्यांच्या अनेक मागण्यांसाठी पुण्यात विविध ठिकाणी निदर्शने केली. पुणे रेल्वे स्थानकावरील पोस्ट ऑफीसचा पार्सल विभाग बंद राहिला. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांकडूनही आंदोलन करण्यात आले, रेल्वेच्या अनेक कामगारांनीही निदर्शने केली. राष्ट्रीय मजदूर युनियनच्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आंदोलनात सहभागी होत काँग्रेस भवनात मेळावा घेतला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी पिंपरी चिंचवडमधील कामगारही मोर्चात सहभागी झाले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही विविध संघटनांनी आंदोलन करत बंदमध्ये सहभाग घेतला. या वेळी पुण्यातील रेल्वे कामगारांचे ऑल इंडिया आरएमएस अँड एमएमएस एम्प्लॉइज युनियन, बीएसएनएल एम्प्लॉइज युनियन आणि एनएफटीई बीएसएनएल कृती समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या सहा कामगार संघटना, कामगार कर्मचारी संघटना, संयुक्त कृती समितीतील आठ कामगार संघटनांनी सहभाग घेतला. नवे कामगार कायदे मागे घेण्यासोबतच महाराष्ट्रातील जनसुरक्षा विधेयक माघारी घेणे, निवृत्ती वेतनाची नवी योजना बंद करणे, बीएसएनएलचे खासगीकरण करू नये, वीज वितरणात खासगी कंपन्यांना समांतर परवाना रद्द करणे, विलंबित सरकारी कर्मचारी भरती करावी, शेती पिकाला हमीभाव, गिग कामगारांना कामगार म्हणून मान्यता देणे, संरक्षण क्षेत्रातील कॉर्पोरेटीकरण रद्द करणे, १० वर्षांपासून बंद असलेली श्रम परिषद आयोजित करणे, अशा अनेक मागण्या या वेळी या संघटनांकडून करण्यात आल्या.