पुणे; ध्वनिक्षेपकाबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही

पुणे –धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांच्या आवाजाच्या मर्यादांबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्व धार्मिकस्थळांना या अनुषंगाने अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, मदत करण्याची आमची भूमिका असल्याचे मत मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मांडण्यात आले.
“अवामी महाझ’ सामाजिक संघटनेने गुरुवारी बैठक बोलावली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अवामी महाझचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे ऍड. अयूब शेख, नुरुद्दीन सोमजी, ऍड. शेरकर, संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी, इक्बाल शेख, मशकूर शेख, इक्बाल अन्सारी, मुश्ताक पठाण, अंजुम इनामदार, इक्बाल तांबोळी, असलम बागवान आदी उपस्थित होते.
…तर शांतता, सुव्यवस्था राखली जावी
पुण्यातील 500 मशिदींना आम्ही ध्वनिक्षेपक परवानगीसंबंधी अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी परवानगी आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे. इतर धर्मस्थळांनादेखील ध्वनिक्षेपक परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रियेत मदत करू. निवडणुका असल्याने या पार्श्वभूमीवर काही मुद्दे पुढे आणले जात असल्याने शांतता, सुव्यवस्था राखली जावी, अशी आमची भूमिका आहे. हीच सर्वांची भूमिका असली पाहिजे. पुणे शहर, महाराष्ट्र राज्य शांतताप्रिय आहे आणि राहील, असे डॉ. पी.ए. इनामदार म्हणाले.





