Pune: खासगी बसची चार ते पाच वाहनांना धडक; दोन जण गंभीर जखमी

पुणे – कोथरूड येथील मेट्रो स्टेशन जवळ वनाज कॉर्नर परिसरात मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला आहे. एका खासगी बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली, त्यामध्ये दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी बस चालकाला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बाळू थोरात ( वय.४६, रा. चाफेकर चौक चिंचवड) असे या बसचालकाचे नाव आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कोथरूड पोलिस ठाण्यात सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनाज कॉर्नर परिसरात एका भरधाव बसने वाहनांना धडक दिली. बसच्या धडके समोरील वाहने एकमेकावर आदळली. तीन ते चार वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे. त्यामध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हे दोघे बस आणि समोरील वाहनाच्यामध्ये दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान,चालकाने मद्य प्राशन केले होते की अन्य कोणत्या कारणातून हा अपघात झाला याचा देखील तपास आता पोलीस केला जात आहे.





