Pune : सिंहगडावर जाण्यासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक

पुणे – पुण्यात येणारा एकही जण असा नाही की, जो सिंहगड किल्ल्यावर गेलेला नाही. तर, शहरातील प्रत्येकाचे सिंहगडावर इतिहास जाणून घेण्यासाठीच जातोच. परंतु, आता सिंहगडावर जाण्यापूर्वी पर्यटकांना नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. सिंहगडावर जाण्यासाठी किल्ले सिंहगड या मोबाइल अॅपद्वारे पूर्वनोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून हा असा नियम लागू करणारा महाराष्ट्रातील हा पहिला किल्ला ठरला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस ही योजना राबविल्यानंतर, अॅपद्वारे नोंदणी पूर्णपणे बंधनकारक केली जाईल. याशिवाय, वन विभागाने प्रतिदिन पर्यटकांची प्रवेश मर्यादा ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाने पर्यटकांची वाढती संख्या आणि सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात (रविवारी) 12 हजार पेक्षा अधिक पर्यटक गडावर येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने किल्ले सिंहगड अॅपद्वारे पर्यटकांना आधी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे. हे अॅप अँड्रॉइडच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आयफोन वापरकर्त्यांसाठीही ते उपलब्ध होणार आहे.
अॅपमध्ये काय आहे?
– सिंहगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती
– वनसंपदा आणि वन्यजीवांची माहिती
– वाहतूक कोंडी, मधमाशा हल्ला, अपघात झाल्यास अलर्ट
– गड परिसरातील पार्किंग सुविधा
– वणवा किंवा इतर आपत्कालीन स्थितीची माहिती
‘पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांना या अॅपमुळे फायदा होईल. यामुळे पर्यटकांची संख्या आणि गडावरील स्थितीवर लक्ष ठेवणे सोपे होईल. गर्दी वाढल्यास तत्काळ प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेता येईल.’ – मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी.





