Pune: अभ्यासिकांच्या फायर ऑडिटचे काम; महापालिका प्रशासन, अग्निशमनकडून सर्वेक्षण

पुणे – नवीपेठेतील अभ्यासिकेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याबाबतचा अहवाल आता महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. अग्निशमन दलाकडूनही अभ्यासिकांच्या पाहणीचे (फायर ऑडिट) काम करण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडूनही अभ्यासिकांची पाहणी सुरू करण्यात आली होती. मात्र, दिवाळीमुळे संबंधित काम थांबले होते, दिवाळीनंतर आता पुन्हा या कामाला सुरूवात झाली आहे.
नवी पेठेतील ध्रुवतारा अभ्यासिकेला ऑक्टोबर महिन्यात आग लागल्याची घटना घडली होती. आगीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले होत. या घटनेमुळे अभ्यासिकांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला होता. याची गांभीर्याने दखल घेत, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण करून, दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा आदेश प्रशासनास दिला होता. त्यानुसार, महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून अहवालाची दखल घेऊन अभ्यासिकांना कोणकोणत्या उपाययोजना, सूचना लागू केल्या जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, बांधकाम विभागाकडून शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ या परिसरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
त्यामध्ये संबंधित अभ्यासिकांकडून महापालिकेच्या नियमांचे पालन केले जात आहे का?, अभ्यासिकांची रचना, विद्यार्थ्यांची संख्या, आगविरोधक यंत्रणा या स्वरूपाची माहिती घेत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये बहुतांश अभ्यासिकांमध्ये आगविरोधी यंत्रणांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल व अभ्यासिकांना बजावण्यात येणाऱ्या नोटीसचे स्वरूप महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अभ्यासिकांची सद्यःस्थिती
– अभ्यासिकांची संख्या – ७५० पेक्षा जास्त
– स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अंदाजे अडीच लाख
– मध्यवर्ती पेठांसह शिवाजीनगर, डेक्कनला सर्वाधिक अभ्यासिका
– बहुतांश अभ्यासिका जुने वाडे, जुन्या इमारतींमध्ये सुरू
“आगीच्या घटनेनंतर अभ्यासिकांच्या पाहणीचे काम सुरू करण्यात आले. दिवाळीमध्ये हे काम थांबले होते, आता पुन्हा अभ्यासिकांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण करून, त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल.” – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.





