Pune: पौड फाटा- बालभारती रस्त्यासाठी आग्रही

पुणे – पौड फाटा ते बालभारती रस्ता व्हावा, यासाठी आम्ही आग्रही होतो आणि आजही आहोत. आता पुणे महापालिकेनीही हा रस्ता होणे आवश्यकच असल्याचे केंद्रीय अधिकार प्राप्त समिती (सीईसी) समोर दिलेल्या लेखी स्पष्टीकरणात सांगितले. त्यामुळे हा रस्ता व्हावा, यासाठी आग्रही असलेल्या समितीने पुणे महापालिकेचे अभिनंदन केले आहे.
या प्रश्नाबाबत केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचीही भेट घेणार असल्याची माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी सांगितले.
शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थिती पौड फाटा ते बालभारती हा रस्ता खूप महत्त्वाचा असून, त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासला यासह भोर, मुळशी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे सांगत उज्ज्वल केसकर म्हणाले, पर्यावरण महत्त्वाचे आहेच. त्याचबरोबरच नागरी सुविधाही तितकीच महत्त्वाची असून, त्यामध्ये समन्वय साधण्याचे काम पुणे महानगरपालिकेने केले.
दरम्यान, महापालिकेचे आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले आणि पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी या रस्त्याबाबत सीईसीकडे दाखल केलेल्या लेखी स्पष्टीकरणांमध्ये हा रस्ता करणे आवश्यक असून, कायदेशीर आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने केलेल्या सूचनांचे पालन करूनच हा रस्ता होईल. त्यासाठी एका सल्लागाराची नेमणूक करून त्याच्याकडून सर्व कामे करून घेतली जातील, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करत असल्याचे केसकर यांनी सांगितले.
हा रस्ता महत्त्वाचा असून, जुन्या डीपीमधील मंजूर रस्ता आहे. पर्यावरणाचा विचार करूनच या रस्त्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये येथील प्राणी, पर्यावरणाला अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न पाहता हा रस्ता होणे आवश्यकच आहे. त्याबाबत समितीकडे आमची भूमिका मांडली आहे.” अनिरुद्ध पावसकर – मुख्य अभियंता, पथविभाग, पुणे मनपा





