Pune : विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमावर पोलिसांचा कब्जा; अतिरेक बंदोबस्ताचा फटका

पुणे : वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी अक्षरशः कब्जा केला. सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या अतिरेक बंदोबस्ताचा फटका माजी महापौर, माजी नगरसेवक आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बसला. मंडईत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन मिरवणुकीची सुरुवात करण्याची परंपरा असताना पोलिसांनी बॅरिगेटिंग करून राजकीय पदाधिकाऱ्यांना अडवून ठेवले.
पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांनाही पोलिसांनी बाहेर थांबवले. महापालिकेचा कार्यक्रम असूनही पोलिसांनी त्यावर ताबा मारणे हा थेट अधिकारक्षेत्राचा हस्तक्षेप असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दशकांपासून ही सुरुवात महात्मा फुले मंडईत होत आहे. पूर्वी महापौर हा विधी पार पाडत असत; परंतु प्रशासक नियुक्त झाल्यापासून ही जबाबदारी आयुक्तांकडे आहे.
आजही पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांच्यासह सर्वपक्षीय माजी नगरसेवक उपस्थित असतानाही पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ओळख नसल्याचा पवित्रा घेत अडवून ठेवले. या गोंधळामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “महापालिकेचा कार्यक्रम पोलिसांनी का बिघडवावा?” असा जळजळीत सवाल केला जात आहे.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, नगर सचिव यांना देखील पोलिसांनी थांबवले. ओळखपत्र दाखवूनही प्रवेश नाकारण्यात आला. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर काहींना आत सोडण्यात आले. मात्र या दुटप्पी कारवाईवर अधिकारी आणि पदाधिकारी संतप्त झाले. पत्रकारांनाही पास दाखवूनही अडवले गेले, हे तर थेट दडपशाहीचे उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
पत्रकारांचा कक्ष चुकीच्या ठिकाणी
पत्रकारांसाठी उभारलेला कक्ष हा मानाच्या गणपतींचा चेहराच दिसणार नाही अशा दिशेला ठेवण्यात आला. त्यामुळे छायाचित्र किंवा व्हिडिओ शूट करताना फक्त पाठ दिसणार होती. हे निदर्शनास आणूनही पोलिसांनी अडवणूक थांबवली नाही. हा पोलिसांचा हट्ट आणि दडपशाही वृत्तीच मानली जात आहे.





