Pune: पोलिसांनी नेपाळी नागरिकाला परत मिळवून दिली रिक्षात विसरलेली पैशांची बॅग

पुणे – चायनिजच्या गाडीवर दिड वर्षे कष्ट करुन जमा केलेली 1 लाख 60 हजाराची रक्कम गावाकडे जाताना एक नेपाळी नागरिक रिक्षामध्ये विसरला. त्याच्या कष्टाची ही रक्कम बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या दोन तासात परत मिळवून दिली. यामुळे गहिवरुन आलेल्या नागरिकाला पोलिसांचे आभार कोणत्या शब्दात मानू असे झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार टेक थापा (रा. सांगवी, मूळ राहणार नेपाळ) हे एका चायनिजच्या गाडीवर काम करतात. दिड वर्षे काम करुन जमवलेली रोकड घेऊन ते गावी निघाले होते. रिक्षाने सांगवी येथून शाहीर अमर शेख चौक येथे येऊन उतरले. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरुन ट्रेन पकडणार होते. त्यावेळी त्यांची एक लाख साठ हजार रुपयांची रोकड असलेली सॅक रिक्षामध्ये विसरली.
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवेश करतात त्यांना सॅक रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी ऍपव्दारे रिक्षा बुक केल्याने रिक्षा चालकाशी संपर्क साधला. मात्र रिक्षा चालकाने मोबाईल बंद करुन ठेवला होता. दिड वर्ष कष्ट करुन जमवलेली रक्कम हरवल्याने थापा यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी लागलीच बंडगार्डन पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी रिक्षा चालकाच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन सातत्याने बंद लागत होता. यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला.
यामध्ये रिक्षा पंचायतीचे तुषार पवार यांनी आपल्या व्हॉटस अप ग्रुपवर माहिती शेअर करुन रिक्षा चालकाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिक्षा चालकाच्या जवळच्या व्यक्तीला फोन करुन पोलिसांकरवी निरोपी दिला. गुन्हा दाखल होण्याच्या भितीने रिक्षा चालक सॅक घेऊन पोलिस ठाण्यात दाखल झाला. कष्टाची रोकड पुन्हा मिळाल्याने थापा यांना गहिवरुन आले होते. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, हवालदार अनिल कुसाळकर, अंमलदार ज्ञाना बडे, संजय वणवे यांनी केली.





