Pune Police Extortion : पुण्यात पोलिसांकडूनच खंडणीखोरी! प्राचार्यांना ‘पोक्सो’ची भीती दाखवून ७ लाख उकळले
Pune Police Extortion : दामिनी पथकातील 'रील्सस्टार' महिला कर्मचारी आणि पीएसआयचा प्राचार्यांविरुद्ध कट; विद्यार्थिनीला हाताशी धरून उकळले ७ लाख रुपये.

Pune Police Extortion – पुणे शहरात पोलिसांकडूनच नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचे प्रकार समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. वाघोलीतील अभियंता तरुण- तरुणी प्रकरणानंतर आता धनकवडीतील एका प्राचार्यांकडून तब्बल ७ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
धनकवडी परिसरातील ५५ वर्षीय प्राचार्यांना पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे (३८ पर्वती), दामिनी पथकातील एक महिला कर्मचारी (३५, वाघोली) आणि पोलीस अंमलदार सुदाम तायडे (३५, हिंजवडी) यांनी ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
यातील महिला कर्मचारी पोलीस दलात कबड्डीपटू आणि रील्सस्टार म्हणून ओळखली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ मध्ये या तिघांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना एका विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीचा कागद दाखवला. त्यावर कोणतीही अधिकृत नोंद क्रमांक किंवा पोलीस ठाण्याचा शिक्का नव्हता, तरीही मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला.
प्राचार्यांनी आरोप नाकारल्यानंतर, मुलगी अल्पवयीन आहे, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक होईल आणि संस्थेची बदनामी होईल, अशी धमकी देत माध्यमांमध्ये बातमी झळकवण्याची भीती दाखवली. काही वेळाने १० लाखांत तडजोड झाली, असे सांगत पैसे मागितले. प्राचार्य बडे यांच्या सांगण्याप्रमाणे ७ लाख रुपये मुलीच्या शिक्षणासाठी देण्यास तयार झाले.
त्यांनी घरातील आणि कुटुंबातील सदस्यांच्या वेगवेगळ्या बँकेतील खात्यांतून काही रक्कम काढून ७ लाख रकमेची पूर्तता केली. दरम्यान, प्राचार्याविरुद्ध खोटा तक्रार अर्ज दाखल करून ८ मार्च रोजी दरोडा व वाहन चोरीविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षकांनी प्राचार्यांना बोलावून घेतले होते.
प्राचार्यांनी चौकशीत सांगितले, की मला ब्लॅकमेल करण्यात आले आहे. मुलीला हाताशी धरून माझ्याकडून पैसे उकळले आहेत. हा प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर जाताच त्यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्याकडे दिला आहे.
गुन्ह्याला अशी फुटली वाचा…
ज्या मुलीला समोर करून या तिघांनी प्राचार्यांकडून खंडणी उकळण्याचा डाव रचला, त्या मुलीनेच पलटी मारली. बडे आणि हिंगे या दोघांनी त्या मुलीला दुसऱ्या कॉलेजध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविले. मात्र, उद्देश साध्य झाल्यानंतर त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करत तिला ब्लॉक केले.
ज्या कॉलेजमध्ये होता, तोही प्रवेश गेला, त्यामुळे त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दिला होता. त्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्याकडे होता. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेले तक्रारदार तपासले, त्या वेळी या तिघांचे हे कारनामे समोर आले.
“एका विद्यार्थिनीच्या मदतीने पीएसआय बडे, दामिनी मार्शल आणि कर्मचारी तायडे या तिघांनी प्राचार्यांवर खोटा बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून, अटक करण्याबरोबरच संस्थेच्या बदनामीच्या धाकाने सात लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे”.
– निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा






