Pune News : मुख्य विसर्जन मिरवणुकीत १५० मंडळांना ‘नो एन्ट्री’! पुणे पोलिसांचा मोठा निर्णय
Pune News : पुण्यातील प्रसिद्ध गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेने अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

Pune News : गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर होणाऱ्या पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पोलिसांनी यंदा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांत तात्पुरत्या स्वरूपात मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेल्या सुमारे १५० गणेश मंडळांना यंदा मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. (Pune News)
महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी संबंधित मंडळांना पत्र देऊन परवानगी नाकारली आहे. मॉडेल कॉलनी संघर्ष मित्र मंडळालाही असे पत्र प्राप्त झाले आहे. (Pune News)
मंडळाचे कार्याध्यक्ष अतुल वैद्य यांनी सांगितले की, त्यांचे मंडळ जुने असून यापूर्वी बालगंधर्व परिसरातील नदीपात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. सुमारे चार वर्षांपूर्वी परवानगी घेऊन कुमठेकर रस्त्याने मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास सुरुवात केली.
त्यानंतर दरवर्षी या मार्गाने मंडळ सहभागी होत आहे. अशाच प्रकारे मागील तीन-चार वर्षांत शहरातील विविध भागांतील सुमारे १५० मंडळांनी परवानगी घेऊन मुख्य मिरवणूक मार्गावर प्रवेश मिळविला होता. यंदा मात्र या सर्वांना परवानगी नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Pune News)
-चार प्रमुख मार्गांवर शेकडो मंडळांचा सहभाग
पुण्याची मुख्य विसर्जन मिरवणूक प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार मार्गांवरून पुढे जाते. लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला पारंपरिक प्राधान्य असून, त्यानंतर अन्य मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. २०२२ मध्ये या चार प्रमुख मार्गांवर ६०८ मंडळांनी मिरवणूक काढली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या १,०१५ पर्यंत गेली होती.
यंदा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या ४,१७० झाली आहे. मागील वर्षी ही संख्या ३,९५९ होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचा विस्तार होत असताना मुख्य विसर्जन मिरवणुकीवरील गर्दी आणि व्यवस्थापनाचे आव्हानही वाढत आहे. (Pune News)
३० तासांची मिरवणूक ३४ तासांवर
मुख्य मिरवणुकीचा कालावधी कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर अनेक वर्षांपासून आहे. २०२२ मध्ये मिरवणुकीला सुमारे ३१ तास, २०२३ मध्ये ३० तास २५ मिनिटे, तर २०२४ मध्ये पोलिसांच्या मोजणीनुसार २८ तास ४५ मिनिटे लागली. मात्र २०२५ मध्ये मिरवणूक पुन्हा वाढून ३२ तास २६ मिनिटे, तर अग्निशमन दलाच्या नोंदीनुसार अंतिम विसर्जनापर्यंत सुमारे ३४ तास चालली. (Pune News)
मिरवणुकीत मंडळांचे थांबणे, एकाच वेळी अनेक मंडळे एकत्र येणे, ढोल-ताशा पथकांची संख्या, ध्वनिवर्धकांवरील निर्बंधाच्या काळात मिरवणुकीचा वेग मंदावणे, गर्दी आणि मार्गातील अडथळे यामुळे वेळ वाढत असल्याचे मागील वर्षांच्या पोलिसांच्या नियोजनातून स्पष्ट झाले आहे. (Pune News)
बंदोबस्ताचा ताण, दुसऱ्या दिवशीही शहर ठप्प
मिरवणूक मध्यरात्री ओलांडून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सुरू राहत असल्याने पोलिसांचा बंदोबस्तही दीर्घकाळ कायम ठेवावा लागतो. २०२५ मध्ये पुणे शहरात गणेशोत्सवासाठी सुमारे ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य मिरवणूक मार्गावर गर्दी नियंत्रण, वाहतूक नियमन, मंडळांना पुढे नेणे, महिला व नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था यासाठी पोलिसांना सलग अनेक तास काम करावे लागते. (Pune News)
मिरवणूक लांबल्याने केवळ पोलिसांवरील ताण वाढत नाही, तर मध्यवर्ती पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होतो. लक्ष्मी, टिळक, कुमठेकर, केळकर यांसह प्रमुख रस्ते बंद राहिल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतुकीलाही अडचणी निर्माण होतात. २०२५ मध्ये मिरवणूक मार्गांवरील मोठ्या प्रमाणातील कचरा साफ करण्यासाठी महापालिकेला सुमारे २५० अतिरिक्त कर्मचारी तैनात करावे लागले होते. (Pune News)





