Pune News : वारसा, संस्कृतीकेंद्रित पर्यटनातून पुण्याचे ब्रँडिंग होणे आवश्यक आहे; भारत लांघी यांनी व्यक्त केले मत
पर्यटन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांचा विकास (Pune News) वेगाने आणि गुणवत्तेने केल्यास, पुणे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचा पर्यटन ब्रँड ठरू शकते, असे प्रतिपादन पर्यटन संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक भारत लांघी यांनी केले.

Pune News : पुण्याचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर जाण्यासाठी समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक वैभव, हे घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. पर्यटन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांचा विकास (Pune News) वेगाने आणि गुणवत्तेने केल्यास, पुणे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचा पर्यटन ब्रँड ठरू शकते, असे प्रतिपादन पर्यटन संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक भारत लांघी यांनी शनिवारी येथे केले.
पुणे फेस्टिव्हल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष पर्यटन परिसंवादात ते बोलत होते. देवम टूर्स ॲड ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष नीलेश भन्साळी, पराशर ॲग्री ॲड व्हिलेज टूरिझमचे संस्थापक संचालक मनोज हाडवळे आणि वेलनेस टूरिझमतज्ज्ञ डॉ.. संतोष सूर्यवंशी यांचाही परिसंवादात सहभाग होता.
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम (Pune News) मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते सर्व वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावातील आनंदमळा कृषी पर्यटन केंद्राचे समीर वाघोले यांना कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लांघी म्हणाले, ‘केंद्र सरकारने २०२० मध्ये पर्यटन धोरण जाहीर केले असून, त्यातील धोरणांनुसार कार्यवाही सुरू आहे. आकडेवारीनुसार, दर दहा रोजगारांपैकी एक रोजगार हा पर्यटनाशी संबंधित असतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून पर्यटनामध्ये रोजगाराच्या केवढ्या क्षमता आहेत, याचीही कल्पना येईल. केंद्रीय पर्यटन धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात प्रभावीपणे सुरू आहे.
पुणे हे शिक्षण, वाहन, आयटी, आरोग्य यांचे माहेरघर आहेच, पण पर्यटनाच्या दृष्टीने पुण्याचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि संपन्न संस्कृती, यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पुण्याचे नाव ठळक होत राहील. त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, दर्जेदार व सुरक्षित निवासव्यवस्था, सुरळीत वाहतूक आणि स्वच्छता सुविधांकडे जागरुकतेने पाहावे लागेल.
पर्यटनस्थळ म्हणून पुणे आणि परिसरात कित्येक क्षमता आहेत. जुन्नर परिसर सातवाहनकालीन वारशासह बौद्ध लेण्यांचे केंद्र म्हणून विकसित करता येईल. याशिवाय साहसी पर्यटनाला मोठा वाव आहे. आरोग्य, क्रीडा, पुरातत्त्व, दुर्ग, लेणी, धरणे आणि कृषी, ग्राम पर्यटनाचे पर्यायही मोठ्या प्रमाणात वापरून पाहिले पाहिजेत. त्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रोत्साहनपर योजना उपलब्ध आहेत.
पर्यटन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी या योजनांची माहिती करून त्यांचा लाभ घेतला पाहिजे. महिलांसाठीही अनेक योजना आहेत. स्टार्टअप्ससाठी साह्ययोजना आहेत. युवकांनी तिकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या सोशल मिडिया व्यासपीठांवर पुणे परिसर, महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा जाणीवपूर्वक प्रचारप्रसार केला पाहिजे. अशा एकत्रित प्रयत्नांतूनच जागतिक पातळीवर आपले ब्रँडिंग शक्य होणार आहे.
नीलेश भन्साळी यांनी पर्यटन क्षेत्रात सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मत मांडले. सरकारची ध्येयधोरणे, तरतुदी, योजना आणि खासगी पर्यटन व्यावसायिकांची पूरक साथ, यातूनच पुणे आणि महाराष्ट्राचे पर्यटनाच्या दृष्टीने ब्रँडिंग शक्य होईल. पायाभूत सुविधा, वाहतूक, सुरक्षा हे मुद्दे सरकारी सहभागाशिवाय साकारणे अशक्य आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
सूर्यवंशी यांनी वेलनेस टूरिझमच्या अनेकानेक शक्यता सोदाहरण स्पष्ट केल्या. नैसर्गिक शेती, आयुर्वेदप्रणित जीवनशैली आणि गोशाळा, यातून स्वास्थ्य पर्यटन कसे विकसित करता येते, याचे विवेचन त्यांनी केले. अनेक देशांत कृषी व ग्रामीण पर्यटनाशी संबंधित विषयांचे पदवी अभ्यासक्रम चालविले जातात. आपल्याकडे मात्र तशी तरतूद नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मनोज हाडवळे म्हणाले, विदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी पायाभूत (Pune News) सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि उत्तम भाषेत नेमकी माहिती देणारी व्यवस्था, यांची नितांत आवश्यकता आहे. जिथे या घटकांची पूर्तता दिसते, तिथे विदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते, हा अनुभव लक्षात घेत तातडीने आपल्या पर्यटनस्थळांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. करुणा पाटील यांनी मान्यवरांशी संवाद साधला व सूत्रसंचालन केले.






