Pune Police: विनापरवाना डीजेवर कारवाई करणार! पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांचा इशारा
Pune Police: आगामी दहीहंडी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ ६ च्या कार्यालयात शांतता बैठकीचे आयोजन; विनापरवाना डीजे चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा.

Pune Police – आगामी दहीहंडी आणि ईद या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्सव काळात कोणत्याही परिस्थितीत डीजे वापरण्यास सक्त मनाई आहे. विनापरवाना किंवा नियमांचे उल्लंघन करून डीजे चालवणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जाईल. ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या मंडळांवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ ६ चे उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी दिला आहे.
आगामी दहीहंडी आणि ईद, अन्य उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिमंडळ सहाच्या कार्यालयात विशेष शांतता बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. सणांच्या काळात ‘डीजे’च्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
बैठकीस सहायक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे, अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, परिमंडळ सहामधील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोहल्ला कमिटी, शांतता कमिटीचे सदस्य, मौलवी उपस्थित होते. जीवन बेनिवाल म्हणाले, सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये.
अश्लील, धार्मिक भावना दुखावणा-या किंवा जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल. रस्त्यावर कोणत्याही कारणास्तव वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या वाहतुकीच्या सूचना व मार्गांचे काटेकोर पालन करावे. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, नागरिकांनी मनोगत व्यक्त केले.





