Pune : पीएमपीकडून मंडईपासून तळजाईपर्यंत नवा बसमार्ग

पुणे – नवरात्रोत्सवात तळजाई टेकडीवरील मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांसाठी पीएमपीएकडून महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन ते तळजाई देवी मंदिर हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहे. याचा भाविकांना लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनपासून तळजाई देवी मंदिरकडे जाण्यासाठी नवीन बसमार्ग सुरू करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या निर्देशानुसार हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. नवीन बसमार्ग दि. २४ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर दरम्यान सुरू राहील.
ही बस गाडीखाना-शिवाजीरोड-शाहू चौक-स्वारगेट-एस.टी.कॉलनी-शिवदर्शन-लक्ष्मीनगर-सारंग सोसायटी-सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम या मार्गावर धावणार आहे. सकाळी सात वाजता पहिली बस मेट्रो स्टेशनहून सुटेल. रात्री १२ वाजता शेवटची बस सुटेल. दिवसभरत मेट्रो स्टेशन ते तळजाई मंदिर ११ आणि तळजाई मंदिर ते मेट्रो स्टेशन ११ अशा एकूण २२ फेऱ्या होतील. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.





