पुणे – अंदाजपत्रकातील नगरसेवकांच्या “स’ यादीतील विकासकामांसाठी निधी देण्यावरून स्थायी समिती आणि महापालिका प्रशासनात वाद सुरू आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अखेर महापौरांची शिष्टाई कामी आली आहे. या वादावरून राष्ट्रवादीने आयुक्तांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली.
यानंतर “लोकप्रतिनिधी व प्रशासन हातात घालून काम करत आले आहे. कुठलीही गोष्ट दोन्ही बाजूने ताणली जाऊ नये. यातून सुवर्णमध्य काढावा. गुरुवारी पक्षनेते, आयुक्त व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित बसून मार्ग काढावा,’ अशा सूचना महापौरांनी मुख्यसभेत दिल्या. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
निवडणुकांच्या तोंडावर महापालिका प्रशासनाने वित्तीय समितीचे कारण पुढे करत नगरसेवकांची “स’ यादीतील कामे अडविण्यात आली आहेत. त्यावरून स्थायी समितीतही वाद सुरू आहेत. त्याचे पडसाद मंगळवारी मुख्यसभेत उमटले.
यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. नगरसेवक हरिदास चरवड, आदित्य माळवे, विशाल धनावडे, बाळा ओसवाल, सिद्धार्थ धेंडे, गणेश ढोरे, नगरसेविका राजश्री काळे, मंजुषा नागपुरे, आरती कोंढरे, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी प्रभागात कामे होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना उत्तरे देणे अवघड होत असून या कामांची यादीच वाचून दाखवली. तसेच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या विरोधातच आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी कॉंग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन करताना रंगरंगोटी, पिशव्या खरेदी, नामफलक, बेंचेस अशा एकाच कामाचे टेंडर तीन-तीन वेळा काढले जातात. जेथे कामाची गरज आहे, तेथे खर्च केला जावा. परंतु पैशांचा अपव्यय टाळावा, अशी सूचना केली. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
छोडो कल की बात…
भाजप आणि आयुक्तांमध्ये सुरू असलेल्या वादात उडी घेत, महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नगसेवकांनी गाण्यांची कडवी गात आयुक्तांना वाद विसरण्याचे आवाहन केले. त्यात शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य बाळा ओसवाल यांनी “हा रूसवा सोडा आयुक्त साहेब; बजेट उपलब्ध करून द्या ना ‘ हे कडवे गायले. तर कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी “छोडो कल की बाते..कल की बात पुरानी’ हे गाणे गुणगुणत आयुक्तांचा रूसवा काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण।काहीसे हलके झाले.