पुणे : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पुणे- मेट्रो पुलाबाबत गदारोळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोपांची राळ उठवली आहे. या प्रकारानंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
बदललेल्या मार्गास मान्यता नाही : विरोधक
“नदीपात्रातून वळवलेल्या मेट्रो मार्गास मुख्यसभेची मान्यताच घेतलेली नाही. भाजपने अजित पवार यांच्यापुढे चुकीची माहिती दिली. तसेच गणेश मंडळांनी दिलेल्या प्रस्तावाची दखलही घेतली नाही. याप्रकरणी मुख्यसभेत चर्चा करण्यास भाजप घाबरत आहे,’ असा आरोप विरोधकांनी केला. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह गणेशोत्सव बचाव कृती समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
विरोधकांचे केवळ राजकारण : महापौर
“पुलाच्या कामाबाबत तीन महिन्यांपूर्वी मुख्यसभेत चर्चा झाली होती. त्यानंतर मंडळांसोबतही बैठका झाल्या. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच मुख्यसभेत 300 पेक्षा अधिक विषय चर्चेसाठी होते. त्यामुळे सभागृहात वेळ न घालवता पक्षनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करू, अशी विनंती केली होती. मात्र, ते ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांना यात केवळ राजकारण करायचे आहे,’ असा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला. उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यावेळी उपस्थित होते.





