Pune : हरित पुण्यासाठी तीन हजार झाडांचे रोपण

पुणे -पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लक्झरी रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजराज ग्रुपने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून जागतिक पर्यावरण दिनी म्हणजे गुरुवार, ५ जून रोजी शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिम राबवली. पुण्यातील प्रमुख भागात सहा ते १२ फूट उंचीची तीन हजारांहून अधिक झाडे लावली गेली. शहराचे हरित आवरण आणि हवामान संतुलन साधण्यासाठी हा उपक्रम एक धोरणात्मक आणि शाश्वत मोहिम ठरेल.
याबाबत तेजराज ग्रुपचे सीएमडी तेजराज पाटील म्हणाले की, खरा विकास बांधकामात नसून आपण वारसा म्हणून कोणते विचार समाजाला देतो त्यात आहे. या वृक्षारोपण मोहिमेद्वारे हेच साध्य करण्याचे उद्दीष्ट आहे. समाजात बदल घडायला वेळ लागतो. आपण एक पाऊल टाकले तर लोकांना तुमच्यासोबत येण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. आम्हाला या कार्याचे नेतृत्व करण्याचा अभिमान आहे आणि आशा आहे की इतर संस्थाही हरित पुणे अस्तित्वात आणण्यासाठी आमच्यासोबत येतील.
तेजराज ग्रुपने या उपक्रमाचा भाग म्हणून गणराज चौक, बाणेर आणि पुणे विद्यापीठापासून सुरू होऊन, बाणेरमधील (रस्त्याच्या कडेला), दयानंद चौकापर्यंत दीडहजार झाडे, नाला उद्यान येथे एक हजार झाडे, मॉडेल कॉलनी येथे पाचशे झाडे लावली आहेत. पुढील पाच वर्षे या झाडांची देखभाल तेजराज ग्रुपतर्फेच केली जाणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
पालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे, रस्ता विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर, उद्यान विभागाचे अधीक्षक घोरपडे, आणि इमारत विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बांकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवली. या कार्यास तेजराज ग्रुपला बाणेर-बालेवाडी नागरी मंचचेही सहकार्य मिळाले.





