पुणे – आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तापमानाचा पारा १० अंशांखाली आला आहे. हवेली परिसरात सर्वांत कमी ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर एनडीए, पाषाण, बारामती, शिवाजीनगर या परिसरात किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलेला आहे. किमान तापमान ८ अंशांपर्यंत खाली आल्यामुळे शहराच्या दक्षिण भागातील एनडीए, पाषाण, वारजे, कात्रज, औंध यासह अन्य परिसरात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. मात्र, २४ तासांत थंडीचा पारा कमी होण्याएवजी एक ते दोन अंशांनी वाढलेला आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होईल, आकाश निरभ्र राहील तर दुपारनंतर हवामान ढगाळ राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) हवेली- ९.५, एनडीए- १०.१, बारामती- १०.५, शिवाजीनगर- ११.२, माळीण- ११.४, पाषाण आणि तळेगाव – ११.८, आंबेगाव- १२.४, इंदापूर- १२.७, लोणावळा- १२.९, राजगुरूनगर- १३.७, कोरेगांव पार्क- १५.६, चिंचवड- १७, मगरपट्टा- १७.२