पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पीएमपीचे 600 कर्मचारी वर्ग
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकांना अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचे कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडे कर्मचारी वर्ग करण्यात येत असून, सुमारे 600 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांमधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासह लॉकडाऊन अंतिम टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता दिली असली, तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. शहरात पीएमपीकडून केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच बससेवा सुरू आहे. पालिकेकडे मनुष्यबळ कमी पडत असल्याने प्रशासनाकडून कर्मचारी वर्ग करण्याची मागणी केली होती.
महापालिकेच्या कार्यालयीन कामकाज, रुग्णवाहिका, अत्यावश्यक वाहनांच्या चालक आदी पदांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे महापालिकेकडे 350 आणि पिंपरी-चिंचवड पालिकेकडे 325 कर्मचारी वर्ग केले आहेत. चालक, वाहक, मॅकेनिक, क्लिनर, हेल्पर, सफाई कर्मचारी आदींचा समावेश आहे.
या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये, अशा सूचना चालकांना दिल्या आहेत. करोनानंतर हे कर्मचारी पुन्हा पीएमपीएमएलकडे वर्ग होणार आहेत.





