PUNE: फुले दाम्पत्य सन्मान महारॅली; भिडेवाडा येथील मुलींच्या पहिल्या शाळेला १७६ वर्षे पूर्ण

पुणे – सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांनी दि. १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. याद्वारे त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. या घटनेला १७६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने फुले दाम्पत्याच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. १ जानेवारी रोजी फुले दाम्पत्य सन्मान महारॅली काढण्यात येणार आहे,
याबाबत माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, माजी आमदार कमल ढोले पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष दीपक जगताप यांनी माहिती दिली. दरम्यान, भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत माळी महासंघातर्फे केले जात आहे. ही रॅली सकाळी १० वाजता भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) या मार्गावरून जाणार आहे.
या महारॅलीत अनिल नगरकर यांचे सनई वादन होणार आहे. तसेच नायगाव येथील सावित्रीच्या लेकींचे ढोल पथक, परिंचे येथील गावकऱ्यांचे ढोल पथक, ठाणे आणि पवना डॅम येथील ढोल पथके सहभागी होणार आहेत. रॅली मार्गावर भव्य रांगोळी, सुशोभित रथ, महिलांचा सहभाग आणि हजारो फुलेप्रेमी आणि समाज बांधवांचा सहभाग असणार आहे. या रॅलीद्वारे फुले दाम्पत्याचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित चित्ररथाची मांडणी करण्यात येणार आहे.





