Pune: शहरातील पेट्रोल पंप सुरूच राहणार; ट्रक चालकांच्या संपामुळे पंपावर गर्दी

पुणे – केंद्रशासनाच्या प्रस्तावित हिट ॲंड रन कायद्याच्या विरोधात राज्यभरात ट्रक चालकांकडून आंदोलने केली जात असून अनेक ठिकाणी चक्का जाम करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या ( मंगळवारी) शहरातील पेट्रोल पंप बंद राहण्याची अफवा पसरल्याने संध्याकाळनंतर पुणेकरांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
मात्र, जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकरना पोलिस संरक्षण दिले असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन अली दारूवाला यांनी दिली. संपूर्ण भारतातील वाहतूकदारांच्या संपाचा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही असेही ते म्हणाले.
केंद्रशासनाने नवीन मोटार कायद्यात बदल सुचविले आहेत. त्यात, अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षाची शिक्षा तसेच ७ लाखांचा दंड असणार आहे. या तरतूदीस मालवाहतूकदार संघटना तसेच ट्रक चालकांचा विरोध आहे. त्यामुळे तत्काळ हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी देशभरात ट्रक चालकांकडून चक्काजाम करण्यात येत आहे.
त्याचा फटका एसटी बसेस आणि पेट्रोलची वाहतूक करणार्या वाहनांना बसला असल्याने उद्या पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे सोमवारी सांयकाळी नागरिकांनी पेट्रोलसाठी पंपावर मोठया प्रमाणात गर्दी केली होती.त्यानंतर, असोसिएशनने याबाबत खुलासा केला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पेट्रोल पंप नियमित सुरू राहणार असल्याचे दारूवाला यांनी स्पष्ट केले आहे.





