Guillain Barre Syndrome : पुणेकरांनो काळजी घ्या! गुइलेन बॅरे सिंड्रोमचा धोका वाढला; आता रुग्ण संख्या २२ वरुन….;

पुणेः शहरात नव्या व्हायरसने शिरकाव केलेली बातमी आल्याने पुणेकरांच्या मनात धडकी भरली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) असे या आजाराचे नाव असून सुरूवातीला या आजाराचे २२ रुग्ण पुण्यातील सिंहगड आणि इतर भागात आढळल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता हा आकडा काहीसा वाढला असून बाधित रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका अलर्ट मोडवर असून यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच रुग्ण ज्या भागात आढळले आहेत त्या भागात महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.
२४ रुग्ण हे व्हेंटिलेटर असल्याचे सांगिण्यात आले असून पुणे महापालिका हद्दीत ५, पिंपरी-चिंचवड महापालिकेत २, ग्रामीण भागात १६ आणि पुणे जिल्हा बाहेरील १ असे रुग्ण आढळूले आहेत. यापैकी ८ रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार केले जात आहेत. हा आजार १ लाख लोकसंख्येमागे एकाला होतो. हा आजार अत्यंत दुर्मिळ आजार असून रुग्णाच्या मज्जातंतूवर आघात करतो. काही दिवसांपूर्वी एका ६५ वर्षीय महिलेला गुइलेन बॅरे सिंड्रोम आजार झाला होता. या महिलेने तात्काळ रुग्णालय गाठत यावर उपचार केल्याने ती महिला यातून बरी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
या आजाराची गांभीर्याने दखल घेऊन याचे विश्लेषण करण्यासाठी नऊ जणांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये एनआयव्ही, राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, बी. जे. मेडिकल कॅालेज, पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी, स्वंयसेवी संस्थांचा सहभाग आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराची लक्षणे कोणती?
हातापायाची ताकद कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे, गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही साधारणपणे या आजाराची लक्षणे आहेत.
नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे
महापालिकेच्या वतीने सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, त्या रुग्णांचे रक्ताचे आणि लघवीचे सँम्पल नॅशनल इन्स्टीट्यूट अॅाफ व्हायरोलॅाजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पाण्याचे देखील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
पाणी उकळून पिण्याचे आवाहन
या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर अंगावर न काढता डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. सिंहगड रोड आणि परिसरातील या आजाराने आढळून आलेले संशयित रुग्णांना लूज मोशन आणि ताप देखील आहे. या आजारामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. बहुतेक बाधित रुग्णांना रुग्णालयाची आवश्यकता भासते. खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.





