Pune: फुटपाथवर पार्किंग… धनकवडीत अतिक्रमणेही वाढली

धनकवडी – स्वारगेट-सातारा रस्त्यावर फुटपाथवर दुचाकी वाहने उभी (पार्क) केली जात असल्याने पादचाऱ्यांची ग़ैरसोय होत आहे. महापलिका प्रशासन व सहकारनगर वाहतूक पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने या परिसरात फुटपाथवर पार्किंंग केले जात असून अनेक ठिकाणी अतिक्रमणेही वाढील आहेत. परिसरातील बहुतांशी रस्त्यांवरील फुटपाथची अशीच स्थिती झाली आहे.
स्वारगेट-सातारा रस्त्यावर धनकवडी-बालाजी नगर येथील शाहू बँक चौक ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडे जाताना सर्विस रस्त्यावर दुकानांसमोर अनेक ठिकाणी सर्रास दुचाकी वाहने फुटपाथवर उभी करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेला फुटपाथ दुचाकींचे पार्किंग झाला आहे. रस्त्याच्या बाजूने अनेक बँका असून या ठिकाणी देखील फूटपाथवर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात आहेत.
धनकवडी-बालाजी नगर परिसरात फुटपाथवर अनधिकृतपणे पथारीवालेही व्यवसाय करीत आहेत. लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन ते त्रिमूर्ती चौक या फुटपाथवर अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी पथारी व्यवसायिक बसलेले असतात याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून फुटपाथ करण्यात आले असले तरी फुटपाथचा वापर पादचाऱ्यांपेक्षा अनधिकृतरित्या व्यावसायिकच करीत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने तसेच वाहतूक पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.
“फुटपाथवर पथारीवाले, भाजी विक्रेते व अन्य व्यावसायिक विनापरवाना बसले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे तसेच फुटपाथवर वाहने पार्क केली असतील तर त्या संदर्भात वाहतूक नियंत्रण पोलीस यांना पत्र देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येतील.” – सुभाष जगताप, अतिक्रमण निरीक्षक, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय
“नियमबाह्य पद्धतीने फुटपाथवर लावण्यात येणाऱ्या वाहनांवर सहकार नगर वाहतूक पोलीस विभागामार्फत नियमित कारवाई करण्यात येत आहे. तरीही वाहने नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेल्या वाहनांवर अधिक तीव्र दंडात्मक कारवाई तात्काळ करण्यात येईल.” – शिल्पा लंबे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग सहकार नगर पोलीस स्टेशन.





