Pune: गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती

पुणे – पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आली असून, देशमुख यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. नुकतीच राज्य शासनाच्या गृह विभागाने त्यांची पदोन्नतीसह पुणे शहरात बदली केली होती.
देशमुख यांच्यासह पुण्यात बदलून आलेल्या तीन अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, पंकज देशमुख यांच्याकडे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्तपद, तर राजेश बनसोडे यांची अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बनसोडे हे यापूर्वी बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत होते.
तसेच, नागपूर येथील अपर पोलीस आयुक्तपदावरून पुण्यात बदलून आलेले संजय बी. पाटील यांना अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. या नव्या नेमणुकींमुळे पुणे शहर पोलीस दलाच्या प्रशासकीय आणि गुन्हे नियंत्रण यंत्रणेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





