Pune : घोरपडी पेठेत ऑनलाईन मटका; एकाला अटक, १७ जणांवर गुन्हे दाखल

पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने घोरपडी पेठ परिसरात मध्यरात्री छापा टाकून ऑनलाईन मटका जुगार घेणाऱ्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत मोबाईल फोन, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १७ मोबाईल क्रमांकांवर ऑनलाईन बुकींग चालू असल्याचे उघड झाले आहे. त्यानूसार १७ जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी पोलिस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, राहुल दिलीपसिंग परदेशी ( ४२, रा. धायरी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. परदेशीचे शिक्षण बी कॉम झाले असून तो हा एका खासगी बँकेत रिकव्हरी एजंट म्हणून काम पहातो.
खडक पोलीसांना गुरुवारी रात्री गस्ती पथकातील आशिष चव्हाण, इरफान नदाफ यांना खबर मिळाली की, घोरपडी पेठेतील कै. निळु फुले जलतरण तलावाजवळ सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती मोबाईलद्वारे मटक्याचे आकडे घेऊन ऑनलाईन जुगार खेळवत आहे.
ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना कळविण्यात आली. त्यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. छाप्यात आरोपी एका दुचाकीवर बसून मोबाईलवर मटक्याचे आकडे घेताना दिसून आला.
ऑनलाईन व्यवहार उघड
त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये १७ मोबाईल क्रमांकांवरून मटका बुकींग घेतले जात असल्याचे आढळले. तसेच मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे व पेटीएम सारखी मनी ट्रान्सफर अॅप्स असल्याचेही पोलिसांना आढळले. चौकशीत आरोपी परदेशी याने कबुली दिली की तो मटक्याचे आकडे ग्राहकांकडून घेऊन मोबाईलवर नोंदवतो आणि त्याबदल्यात रोख तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे स्वीकारतो.
या कारवाईत उघडकीस आलेल्या मोबाईल क्रमांक धारकांची चौकशी करण्यात येणार आहे. ऑनलाईन माध्यमातून जुगाराचा पैसा फिरत असल्यामुळे आर्थिक व्यवहारांचाही तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव करत आहे





