केंद्राकडून मंजुरी; मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश पुणे – केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ‘ई-बस’ खरेदीला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात या बस दाखल होतील आणि पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक भक्कम होऊन शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठीही मदत होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशांना सेवा दिली जाते. पीएमपीच्या ताफ्यात सध्या दोन हजार बस आहेत. त्यातील ७५० बस स्वमालकीचा तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार बस असणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. त्याबाबत अधिक माहिती देताना मोहोळ म्हणाले, या प्रक्रियेत बसेससाठी निधी उपलब्ध व्हावे, आवश्यक असलेले पत्र राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठवले जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तत्काळ प्रस्ताव राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला. त्यानंतर या एक हजार ई-बससाठीचा प्रस्ताव पीएमपीएमलमार्फत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्यासाठी एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्लीत भेट घेत सविस्तर चर्चा केली. त्यानुसार मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पीएमपीला नव्याने १००० ई-बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.