Pune : एका नियमाकडे दुर्लक्ष अन् नकाशाच बदलला; १६ प्रभागांना फटका

पुणे – महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना करताना निवडणूक विभागाच्या एका मुख्य नियमाकडे दुर्लक्ष केल्याने प्रभाग रचनेचा नकाशाच बदलण्याची वेळ महापालिका प्रशासनावर ओढवली. नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसाठी काढलेल्या आदेशात, प्रभाग रचनेची कार्यपद्धती करताना नियम ५.३ मध्ये प्रभागांची संख्या शक्यतो चार सदस्यांची करावी.
तसेच सर्व प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा करावा; अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे करावेत आणि शेवटचे प्रभाग भौगोलिक सलगता असणारे करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून राजकीय दबावाखाली नियमांकडे दुर्लक्ष करत तीन सदस्यांचे तीन प्रभाग तयार केले आणि ते मनमानी पद्धतीने कुठेही केले.
परिणामी हे तीनही प्रभाग नियमात बसत नसल्याने नगरविकास विभागाने ते रद्द करून शेवटचा प्रभाग पाच सदस्यांचा केला आहे. प्रशासनाच्या या चुकीचा तब्बल १६ प्रभागांना फटका बसला असून. त्यांच्या हद्दी आयत्यावेळी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास ६४ नगरसेवकांना कमी- अधिक प्रमाणात फटका बसला आहे.
शिवसेनेचा भाजपला नियमांचा झटका
महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचे ४० प्रभाग, तर पाच सदस्यांचा एक प्रभाग अशा एकूण ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. प्रशासनाने शासनाच्या निकषानुसार सुरुवातीला ३९ प्रभाग चार सदस्यांचे आणि तीन प्रभाग तीन सदस्यांचे असे ४२ प्रभाग तयार केले होते. पाच सदस्यांचा एकही प्रभाग नव्हता. हे तीन सदस्यांचे प्रभाग पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या मतदारसंघातील होते.
सोमवार पेठ- रास्ता पेठ- मंगळवार पेठ, सॅलिसबरी पार्क आणि बालाजीनगर हे प्रभाग सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरणारे होते. त्याची माहिती फुटल्याने त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडे प्रारूप प्रभाग रचना सादर झाल्यानंतर यात बदल करण्यात आला.
तीनचे प्रभाग करणे नियमात बसत नसल्याने त्याऐवजी पाच सदस्यांचा एक प्रभाग करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासही उशीर झाला. आयत्या वेळी हा तीन सदस्यांचा प्रभाग चारचा केल्याने त्यालगतचे प्रभाग, तसेच पाचवा प्रभाग तयार करण्यासाठी प्रशासनास मोठ्या प्रमाणात बदल करावे लागले.
या प्रभागांना बसला फटका
तीन प्रभाग रद्द करून एक पाच सदस्यांचा प्रभाग तयार केल्याने १६ प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल झाला आहे. यात लोहगाव-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ, येरवडा-गांधीनगर, पुणे स्टेशन-जयजवाननगर, कमला नेहरू रुग्णालय-रास्तापेठ, रविवार पेठ- नाना पेठ, काशेवाडी-डायस प्लॉट, गुरुवार पेठ-घोरपडे पेठ, मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क, कोंढवा खुर्द-कौसरबाग, बिबवेवाडी-महेश सोसायटी, अप्पर-इंदिरानगर.
कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी, वानवडी-साळुंखेविहार, नऱ्हे-वडगाव बुद्रुक, तसेच कोरेगाव पार्क-मुंढवा या प्रभागांचा समावेश आहे. काही ठिकाणी किरकोळ, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हद्दी बदलल्याने हक्काची मतपेटी अन्य प्रभागांत गेल्याने राजकीय समीकरणांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.





