Pune : ‘चॉकलेट’ टोळीतील एकाला ‘मोक्का’च्या गुन्ह्यात जामीन मंजूर

पुणे – बांधकाम व्यावसायिकाची गाडी अडवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात मोक्का असलेल्या चॉकलेट टोळीतील प्रणित उर्फ रिंकू दाभाडे याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायमुर्ती एम. एस. कर्णिक यांनी जामीन मंजुर केला आहे. त्याने ऍड. प्रणित नामदे, ऍड. अजित पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
सन 2021 मध्ये एका बांधकाम व्यासायिकास चॉकलेट ऊर्फ धनेश शिंदे याच्या टोळीमार्फत खंडणीची मागणी केली होती. ती मागणी मान्य न केल्यामुळे चोकलेट गॅंगने त्या बांधकाम व्यावसायिकाची गाडी अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी कामशेत पोलिसांमार्फत चॉकलेट गॅंग विरुध्द मोका कायद्याअंतर्गत कार्यवाही केली होती.
या प्रकरणी कारागृहात असलेल्या रिंकू दाभाडे याने उच्च न्यायालयात ऍड. निरंजन भावके, ऍड. प्रणित नामदे, ऍड. अजित पवार यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
आरोपीचा टोळीप्रमुखा सोबत कुठलाही गुन्हा नाही. तसेच त्याचा स्वतःच कबुली जबाब त्याच्या विरुद्ध पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. तसेच दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीकडून प्राप्त झालेले हत्यार गुन्ह्यामध्ये वापरण्यात आले नाही, असा बचाव पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजुर केला.





