पुणे – मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने “पुणे वन कार्ड’द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड “पीएमपी’लाही लागू होईल, अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून प्रत्येक 500 मीटरवर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एनडीए चौकातील कार्यक्रमात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो आणि पुणे वन कार्ड लॉंचिंग कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरातही “पुणे वन कार्ड’चा उपयोग होऊ शकेल. पुणे मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीकडे नागरिकांचा कल वाढू लागल्याचे सध्याच्या प्रवासी संख्येवरून दिसून येते. नागरिकांना घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था दिल्यास नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील. पीएमपीएमध्ये आता स्मार्ट सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये बस कुठे आहे, प्रवाशी ज्याठिकाणी उभा आहे त्याठिकाणी बस येण्यास किती वेळ लागेल. बसमध्ये बसण्यासाठी किती सीट मोकळ्या आहेत याची माहिती एका ऍपवर कळणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रवाशी संख्या वाढण्यास मदत होईल.’ तर पुणे हे भारतातील सुंदर शहर… मुळा-मुठा शुद्धीकरण प्रकल्पामुळे शहरातील आणि शेतीसाठी पाण्याची समस्या दूर होईल. पुण्यातील कचरा व्यवस्थापन आणि विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात पुणे देशातील सुंदर आणि राहण्यायोग्य शहर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात आमदार भीमराव तापकीर यांनीही मनोगत व्यक्त करत युती सरकारच्या यशस्वी प्रकल्पांचा उल्लेख केला. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर केंद्राशी समन्वय “वाहतूक कोंडी असलेल्या पहिल्या सहा शहरांत दुर्दैवाने पुण्याचा नंबर लागतो. एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, “पुण्यात 10 किलोमीटर जायचे असेल, तर 30 मिनिटे 29 सेकंद एवढा वेळ लागतो. तेच प्रमाण गर्दीच्या वेळेत 40 मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पुण्यातून वेगवेगळ्या शहरांत जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. उन्नत रस्ते तयार करून ही समस्या दूर करता येईल. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून त्यासाठी राज्य शासनही आपला वाटा उचलेल,’ असे फडणवीस यांनी सांगितले. असे आहे मेट्रोचे “पुणे वन कार्ड’ पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी प्रीपेड मेट्रो कार्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी महामेट्रोने खासगी बॅंकांसोबत भागीदारी केली असून भारतीय पेमेंट (रुपे) योजनेवर आधारित आहे. मेट्रोच्या प्रवासाबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. हे एक स्पर्शविरहित (कॉन्टॅक्टलेस) कार्ड आहे. याद्वारे एकल व्यवहारासाठी 5 हजार रुपयांपर्यंत कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. कार्ड वापरण्याचे फायदे मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवास सुरू करताना गेटवर हे कार्ड टॅप केल्यावर गेट उघडून प्रवासी आपला प्रवास सुरु करू शकतात आणि स्टेशनमधून बाहेर पडताना बाहेर पडण्याच्या गेटवर हे कार्ड टॅप केल्यावर प्रवासाच्या भाड्याइतके पैसे अकाउंटमधून आपोआप कापले जातील. पालक आपल्या शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या पाल्यांसाठी हे कार्ड घेऊ शकतात. तिकिटासाठी रोख पैसे बाळगण्याची गरज भासणार नाही. मेट्रो प्रवास आणि शॉपिंगसाठी प्रीपेड कार्ड मेट्रो प्रवास आणि किरकोळ खरेदीसाठी आता एकच कार्ड मेट्रोच्या प्रवासासोबतच कुठेही शॉपिंग अथवा इतर रिटेल खरेदीचे पैसे देण्यासाठी वापरता येणाऱ्या प्रीपेड मेट्रो कार्डची सुविधा महामेट्रोने उपलब्ध करून दिली आहे. “पुणे वन कार्ड’ या नावाने हे कार्ड आहे. त्याचे लोकार्पण शनिवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.